Anganwadi Sevika Salary: राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. मार्च महिन्याच्या मानधन व प्रोत्साहन भत्त्यासाठी सरकारने ₹174 कोटींचा निधी वितरित केला आहे.
राज्यात सुमारे 1.10 लाख अंगणवाडी केंद्रांमध्ये 1.09 लाख सेविका आणि 1.06 लाख मदतनीस कार्यरत आहेत. निधी उशिरा मिळाल्याने या कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची टीका होत होती.
सध्या अंगणवाडी सेविकांना ₹13,000 तर मदतनीसांना ₹7,500 मानधन दिले जाते. यामध्ये केंद्र व राज्य सरकारचा अनुक्रमे 60% आणि 40% असा वाटा आहे. केंद्राचा हिस्सा रखडल्याने मानधनात विलंब होत असल्याची समस्या होती.
दरम्यान, ‘SNA स्पर्श’ प्रणाली लागू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून केंद्र सरकारची मंजुरीही मिळाली आहे. त्यामुळे आता केंद्राचा हिस्सा थेट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयामुळे मार्च महिन्याचे मानधन लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता असून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
