Maharashtra Farmers Relief News | नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांना बराच काळ त्रास देणाऱ्या दोन मोठ्या समस्या—मुसळधार पावसामुळे होणारे पीक नुकसान आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे होणारी हानी—यावर अखेर मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये महत्त्वाचा बदल करत, या दोन्ही प्रकारच्या नुकसानींना अधिकृतपणे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल २०२६ च्या खरीप हंगामापासून लागू होणार आहे.
वन्य प्राण्यांचे हल्ले आता विमा संरक्षणात
हत्ती, रानडुक्कर, नीलगाय, हरीण आणि माकडांच्या हल्ल्यांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. अनेक राज्यांनी या नुकसानीला विमा संरक्षण देण्याची मागणी केली होती. अखेर केंद्राने यास मान्यता देत, या प्रकाराला स्थानिक जोखीम श्रेणीतील पाचवा अतिरिक्त कव्हर म्हणून समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि उत्तराखंड या राज्यांतील लाखो शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे.
पावसाने पिके पाण्याखाली गेली तरीही भरपाई मिळणार
मुसळधार पाऊस किंवा पुरामुळे पिके पाण्याखाली जातात आणि शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी होते. आता हे नुकसानही पीएम पीक विमा योजनेअंतर्गत भरपाईच्या कक्षेत येणार आहे.
शेतकऱ्यांना पूर्ण करावी लागणारी एक महत्त्वाची अट
सरकारने स्पष्ट केले आहे की, नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
पिकाचे नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत शेतकऱ्यांनी:
पीएम पीक विमा ॲपवर लॉगिन करून
जिओटॅग केलेले फोटो अपलोड करणे
आणि ऑनलाइन नुकसान नोंदवणे
अनिवार्य असेल.
तसेच संबंधित राज्य सरकारांना वन्य प्राण्यांची अधिकृत यादी जाहीर करावी लागणार असून, आधीच्या डेटाच्या आधारे कोणते जिल्हे जास्त जोखमीचे आहेत हे निश्चित करावे लागेल.
या सुधारणांमुळे, नैसर्गिक संकटे आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांनी त्रस्त असलेल्या लाखो शेतकऱ्यांना सुरक्षेची हमी आणि आर्थिक सुरक्षेचा दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा: महाराष्ट्रातील महिलांनाही 10 हजारांची आर्थिक मदत शक्य? बिहारची ‘महिला रोजगार योजना’ ठरली आदर्श.

