Indira Gandhi Widow Pension Scheme Maharashtra : महाराष्ट्रातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील विधवा महिलांसाठी सरकारकडून दिलासा देणारी एक महत्त्वाची योजना म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत चालवली जाणारी ही केंद्र पुरस्कृत योजना ४० ते ७९ वयोगटातील विधवा महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹१५०० पेन्शन दिली जाते. यामध्ये केंद्र सरकारकडून ₹३०० तर राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून ₹१२०० आर्थिक मदत दिली जाते.
कोणाला मिळणार पेन्शन?
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी तसेच ती विधवा असणे आवश्यक आहे. महिलेचे वय ४० ते ७९ वर्षांच्या दरम्यान असावे आणि ती दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील असणे बंधनकारक आहे. तसेच अर्जदार महिलेला इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेतून पेन्शन मिळत नसावी, ही अट लागू आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन असून इच्छुक लाभार्थींनी जवळच्या जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, संजय गांधी निराधार अनुदान शाखा किंवा तलाठी कार्यालयात भेट देऊन फॉर्म घ्यावा लागतो.
फॉर्ममधील सर्व माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह तो संबंधित प्राधिकरणाकडे जमा करावा. अर्ज जमा केल्यानंतर अर्जदाराने पावती घ्यावी, ज्यामध्ये सबमिशनची तारीख, वेळ आणि संदर्भ क्रमांक दिला जातो.
इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज करताना आधार कार्ड, पासपोर्ट साईझ फोटो, पतीच्या मृत्यूचा दाखला, निवासाचा पुरावा, वयाचा पुरावा, बीपीएल कार्ड, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), पत्ता पुरावा आणि बँक पासबुकची प्रत जोडणे आवश्यक आहे.
ही योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विधवा महिलांना स्वावलंबन देण्यासाठी महत्त्वाची ठरत असून सरकारकडून या योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू आहे.
हेही वाचा : लाडकी बहीण योजना e-KYC ला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ.

