महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) वाढता तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. एसटी मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी प्रशासनिक शिस्त आणि संसाधनांचा प्रभावी वापर यावर भर दिला.
या बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच विभाग प्रमुख उपस्थित होते.
2025-26 या आर्थिक वर्षात एसटीचे एकूण उत्पन्न 11,475 कोटी रुपये तर खर्च 12,066 कोटी रुपये झाला. दैनंदिन सरासरी उत्पन्न सुमारे 31.40 कोटी रुपये असून खर्च 33 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक तूट भरून काढण्यासाठी व्यापक सुधारणा आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.
मागील वर्षात जालना, परभणी, बुलढाणा, भंडारा, गडचिरोली, अकोला, धुळे आणि वर्धा हे विभाग नफ्यात होते. मात्र उर्वरित 23 विभागांनी कामगिरीत सुधारणा करण्याची गरज असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
येत्या काळात वाहतुकीचे सुयोग्य नियोजन, उपलब्ध बसेस आणि मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर यावर भर देऊन दैनंदिन तोटा कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात येणार आहे. तोट्यातील विभागांची सखोल चौकशी करून त्यामागील कारणे शोधून त्यावर उपाययोजना राबवण्याचे निर्देशही देण्यात आले.
विशेषतः नागपूर विभागातील कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यावरही मंत्री सरनाईक यांनी भर दिला.
हेही वाचा: महिलांचा 50% सहभागाशिवाय देशाचा विकास अशक्य – ‘नारीशक्ती वंदन’ संमेलनात मुख्यमंत्री फडणवीस.

