Maharashtra Cabinet Decisions 18 November 2025 : महाराष्ट्र मंत्रिमंडळाने आज (18 नोव्हेंबर 2025) राज्य विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. नगर विकास विभागाने सिडकोसह विविध प्राधिकरणांकडे असलेल्या जमिनींचा सुयोग्य वापर करण्यासाठी संकल्पना आधारित आयकॉनिक शहर विकास धोरण मंजूर केले. या धोरणामुळे आधुनिक एकात्मिक वसाहती आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यावसायिक केंद्रे उभारण्याचा मार्ग खुला झाला आहे.
गृहनिर्माण विभागाने बृहन्मुंबई उपनगरातील 20 एकरपेक्षा मोठ्या म्हाडा प्रकल्पांच्या पुनर्विकास धोरणाला मंजुरी दिली असून, येत्या काळात मुंबई महानगर क्षेत्रात परवडणारी घरे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
मदत व पुनर्वसन विभागाने भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी नवीन पदनिर्मितीला मान्यता दिली. 2013 च्या कायद्यानुसार प्रलंबित प्रकरणांची गती वाढणार आहे.
कौशल्य विभागाने रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठासाठी 339 नव्या पदांना मंजुरी दिली असून त्यात 232 शिक्षक आणि 107 शिक्षकेतर पदांचा समावेश आहे.
महिला व बाल विकास विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध अधिनियमातील ‘महारोगी’, ‘कुष्ठरोगी’, ‘कुष्ठालये’ असे मानहानीकारक शब्द वगळण्यास मंजुरी दिली. विधि व न्याय विभागाने महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, 1950 मधील सुधारणा मंजूर केली.
राज्य शासनाचे हे निर्णय शहर विकास, घरबांधणी, कौशल्य शिक्षण आणि सामाजिक सुधारणांमध्ये महत्त्वाचे पाऊल मानले जात आहेत.
हेही वाचा : महाराष्ट्रातील 65 वर्षांवरील गरजू वृद्धांना दरमहा ₹600 देणारी योजना; अर्ज कसा करावा?.

