राज्यातील पायाभूत सुविधांना मोठी चालना देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा विकास समितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुंबई मेट्रो मार्गिका-५अ (टप्पा १ आणि २) या सुमारे १८,१३०.५५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली असून, या निर्णयामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.
३४.२१ किमी लांबीच्या या मार्गिकेत एकूण १९ स्थानकांचा समावेश असून कापूरबावडी–धामणकर नाका (टप्पा १), धामणकर नाका–दुर्गाडी (टप्पा २) आणि दुर्गाडी–कल्याण–उल्हासनगर असा विस्तार होणार आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या भागातील सुमारे ६९ लाख नागरिकांना याचा थेट फायदा होणार असून प्रवास वेळेत ४० ते ५० टक्क्यांनी बचत होण्याची अपेक्षा आहे.
याच बैठकीत विदर्भातील दळणवळण सुधारण्यासाठी तीन महत्त्वाच्या द्रुतगती महामार्ग प्रकल्पांनाही गती देण्यात आली. नागपूर-गोंदिया (१६२.५७ किमी), भंडारा-गडचिरोली (९४.२४ किमी) आणि नागपूर-चंद्रपूर (२०४.७९ किमी) या महामार्गांसाठी आवश्यक भूसंपादनाकरिता हुडकोकडून कर्ज घेण्यास मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांमुळे उद्योग, गुंतवणूक आणि रोजगाराला चालना मिळणार असून सहा वर्षांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठीही पायाभूत सुविधांच्या कामांना वेग देण्यात येणार आहे. वाहनतळ, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य सेवा आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी सुमारे १०६३ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.
या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध विभागांचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा: आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी निधीचे काटेकोर नियोजन करा – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर.

