नांदेड जिल्ह्यातील विविध शासकीय योजनांचा आढावा घेताना पालकमंत्री अतुल सावे यांनी शेतकरी हिताला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना, ‘आयुष्मान भारत’ कार्ड, पाटबंधारे प्रकल्प आणि जिल्हा नियोजन निधीचा वापर यावर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या आढाव्यात शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. योजनेच्या अंमलबजावणीत महसूल, पोलीस, भूमिअभिलेख आणि ग्रामपंचायत यांचा समन्वय आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
आरोग्य विभागाच्या आढाव्यात ‘आयुष्मान भारत’ व महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड वितरणासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांमध्ये जनजागृती वाढवून योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा यावर भर देण्यात आला. तसेच आजारांच्या कव्हरेजची संख्या 1200 वरून 2400 पर्यंत वाढविल्याची माहिती व्यापकपणे पोहोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पाटबंधारे विभागाच्या कामांमध्ये लेंडी धरण, उर्ध्व पैनगंगा व सहस्त्रकुंड प्रकल्पांचा आढावा घेत पावसाळ्यापूर्वी आवश्यक कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. पाणीटंचाई निवारणाची कामे तातडीने पूर्ण करण्यावरही भर देण्यात आला.
दरम्यान, जिल्हा नियोजन निधी वेळेत खर्च न झाल्याबाबत पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित विभागांनी वेळेवर प्रस्ताव न सादर केल्याने निधी परत जावा लागल्याचे त्यांनी नमूद केले. यापुढे नियोजनबद्ध पद्धतीने निधी खर्च करावा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला.
हेही वाचा: नाशिकमध्ये ‘मातोश्री’ मुलींचे वसतिगृह सुरू; आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थिनींना मोठा आधार.

