घोगली येथे ‘निरंजनभाई जयदेवशंकर ठाकर (एनजेटी) वेद पाठशाळे’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी वेद हे मानवजातीसाठी समृद्ध जीवनपद्धतीचे मार्गदर्शन करणारे प्राचीन ज्ञानस्रोत असल्याचे सांगितले.
जगातील अनेक संस्कृती सुमारे चार हजार वर्षे जुन्या असताना वेदांचे अस्तित्व १२ हजार वर्षांहून अधिक असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे, असे त्यांनी नमूद केले. वेद हे केवळ धार्मिक ग्रंथ नसून ज्ञान, विज्ञान आणि जीवनमूल्यांचा आधार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि गोविंद देव गिरी महाराज उपस्थित होते. गडकरी यांनी सनातन संस्कृती मानवकल्याणाचा संदेश देणारी असून भारतीय जीवनपद्धती आदर्श असल्याचे सांगितले.
गोविंद देव गिरी महाराज यांनी वेद हे भारतीय संस्कृतीचे मूलभूत आधार असल्याचे सांगत, वेदांमधील ज्ञान संपूर्ण मानवजातीसाठी उपयुक्त असल्याचे अधोरेखित केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेद परंपरा जपण्यासाठी सुरू करण्यात आलेला हा वेद पाठशाळा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगितले. या माध्यमातून नवीन पिढीपर्यंत भारतीय परंपरा आणि संस्कृती पोहोचवण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा: निवडणुकीत मीडिया कव्हरेजसाठी नवे नियम; मतदान केंद्रात प्रवेशावर कडक नियंत्रण.

