राज्यातील महानगरपालिका क्षेत्रांमध्ये महिला सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी स्वतंत्र आणि परिणामकारक कार्यप्रणाली विकसित करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नगरविकास विभागाला दिले आहेत.
महिला धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात विधान भवनात झालेल्या बैठकीत त्यांनी महिलांच्या गरजा लक्षात घेऊन सुविधा उभारण्यावर भर देण्याचे सांगितले. या बैठकीस नगरविकास विभागाचे उपसचिव अजिंक्य बगाडे तसेच Akshara Centre च्या सहसंचालक नंदिनी शाह उपस्थित होत्या.
याआधी डॉ. गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महिला सुरक्षेसंदर्भात निवेदन सादर केले होते.
बैठकीत सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. उद्याने, क्रीडांगणे, मॉल्स आणि बाजारपेठांमध्ये महिलांसाठी सुरक्षित व सोयीस्कर सुविधा विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच स्वच्छ आणि मानक पाळणाघरे व शिशुगृहे उभारण्यावरही भर देण्यात आला.
महानगरपालिका क्षेत्रांमध्ये अंधाऱ्या आणि निर्जन ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था करणे, बसस्थानके व बाजारपेठांमध्ये स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देणे याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
महिलांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये महिला मदत केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच जेंडर रिसोर्स सेंटर उभारणे, तक्रार निवारण यंत्रणा मजबूत करणे आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर देण्यात आला.
परिवहन सेवांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश देत बसस्थानकांवरील सुरक्षा, अलार्म प्रणाली आणि सुविधा सुधारण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
हेही वाचा: महाराष्ट्रात डेटा सेंटर गुंतवणुकीला गती; कंपन्यांना जागा व वीज त्वरित द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

