नागपूरातील मातृसेवा संघाने शंभराहून अधिक वर्षे महिला आणि बालकांसाठी निस्पृह सेवाभाव जपत आरोग्यसेवेची परंपरा टिकवून ठेवली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. संस्थेच्या १०५ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते.
सीताबर्डी येथील मातृसेवा संघाच्या रंजन सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी स्मृतिफलकाचे अनावरणही करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, शताब्दी महोत्सव वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांसाठी तसेच नवीन महिला वसतिगृह उभारणीसाठी शासनाकडून आवश्यक ती मदत दिली जाईल.
पद्मश्री कमलाताई होस्पेट आणि वेणुताई नेने यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात मातृसेवा संघाची स्थापना केली. त्या काळात सामान्य महिलांसाठी प्रसूती सेवा उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीत गरजू महिलांसाठी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देत संस्थेने समाजात वेगळी ओळख निर्माण केली.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, संस्थेने व्यावसायिकरण टाळून सेवा भाव जपला आहे. महिलांच्या आरोग्यासोबतच बाल आरोग्य सुधारणा आणि बालमृत्यू कमी करण्यासाठीही संघाने मोठे योगदान दिले आहे. त्यामुळेच सामान्य नागरिक आजही या संस्थेशी जोडले गेले आहेत.यावेळी
सुरक्षित मातृत्व, महिला सक्षमीकरण आणि बालआरोग्य यावर विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती देण्यात आली. केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाशी सुसंगत अशी मातृसेवा संघाची वाटचाल असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
शताब्दी वर्षानिमित्त वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभही करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लिंबाचे झाड लावून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेने या वृक्षाचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, अशी सूचना त्यांनी केली.
कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, वैद्यकीय अधिकारी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा: ITI मध्ये जूनपासून नवीन अभ्यासक्रम सुरू; कामठीतील आयटीआयला ‘हेमंत करकरे’ नाव – मंत्री मंगलप्रभात लोढा.

