अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे होत असल्याने बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी राज्यस्तरीय व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले.
राज्यातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविका यांना गावांमधील विवाहांपूर्वी मुलगा-मुलगी यांच्या वयाची खात्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः अक्षय्य तृतीयेच्या दिवशी होणाऱ्या विवाहांवर लक्ष ठेवून बालविवाह होऊ नयेत यासाठी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला समन्वयाने काम करण्यास सांगितले आहे.
तालुका आणि ग्रामस्तरावर विशेष पथके स्थापन करून देवस्थान, मंगल कार्यालये आणि विवाहस्थळांची तपासणी केली जाणार आहे. बालविवाहाचे प्रकरण आढळल्यास तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली महसूल, पोलीस आणि शिक्षण विभाग एकत्रित कृती आराखडा राबवणार आहेत. तसेच मंगल कार्यालये, केटरर्स, प्रिंटिंग प्रेस, फोटोग्राफर आणि धर्मगुरूंनीही वयाची खात्री केल्याशिवाय सेवा देऊ नये, अन्यथा त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
बालविवाह रोखण्यासाठी गावोगावी जनजागृती मोहीम राबवली जाणार असून, ग्रामसभा, पोस्टर, शाळांमधील पालक बैठक आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून प्रचार केला जाईल.
दरम्यान, नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की बालविवाहाची माहिती चाईल्ड हेल्पलाईन 1098 किंवा 112 या क्रमांकावर द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाणार आहे.
हेही वाचा: नांदेड आढावा बैठक: शेतकरी हिताला प्राधान्य; निधी खर्चात हलगर्जीपणावर कारवाईचा इशारा – अतुल सावे.

