महाराष्ट्रात पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर मोठा उपक्रम राबवला जाणार आहे. राज्य सरकारची धोरणात्मक सल्लागार संस्था MITRA (Maharashtra Institution for Transformation) आणि Earth Day Network India यांच्यात 56 लाख वृक्ष लागवड आणि इतर पर्यावरणीय उपक्रमांसाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.
जागतिक वसुंधरा दिन 2026 च्या निमित्ताने हा करार करण्यात आला असून राज्यातील क्लायमेट ॲक्शनला गती देणे हा यामागील उद्देश आहे. या भागीदारीत ‘मित्रा’ संस्था धोरणात्मक मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य देणार असून अर्थ डे नेटवर्क इंडिया प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि जनजागृतीची जबाबदारी पार पाडणार आहे.
या उपक्रमांतर्गत ‘मिशन लाईफ’द्वारे नागरिकांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच सरकारी ऊर्जा ऑडिट चॅलेंजद्वारे ऊर्जा बचत आणि कार्यक्षमता वाढवण्याचे प्रयत्न केले जातील. ‘आर्टिस्ट फॉर द अर्थ’ उपक्रमातून कलाकारांच्या माध्यमातून हवामान बदलाबाबत जागरूकता वाढवली जाणार आहे.
मुंबईला ‘सस्टेनेबल इव्हेंट्स कॅपिटल’ बनवण्याचा प्रयत्नही या कराराचा भाग आहे. मात्र, सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे राज्यभरात 56 लाख वृक्षांची लागवड मोहीम राबवणे.
ही मोहीम ‘ग्रीनिंग महाराष्ट्र’ अभियानांतर्गत राबवली जाणार असून 300 कोटी वृक्ष लागवड उपक्रमाचा भाग असेल. विशेष म्हणजे केवळ वृक्ष लागवड नव्हे, तर झाडांचे जगण्याचे प्रमाण आणि दीर्घकालीन पर्यावरणीय परिणाम यावरही भर दिला जाणार आहे.
या करारामुळे महाराष्ट्र शाश्वत विकासाच्या दिशेने मोठे पाऊल टाकत असून राज्याला ‘क्लायमेट ॲक्शन लीडर’ बनवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा: Election 2026 Media Rules: माध्यम प्रतिनिधींसाठी कडक नियम; मतदान केंद्रांवर ID अनिवार्य.

