राज्यातील बालसंगोपन संस्थांमध्ये राहणाऱ्या मुलांना भावनिक व मानसिक आधार देण्यासाठी ‘मासूम’ प्रकल्पाचा आता राज्यभर विस्तार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला असून, अधिकाधिक गरजू मुलांपर्यंत मदत पोहोचवण्याचा उद्देश आहे.
महिला व बाल विकास विभाग आणि Aditya Birla Education Trust यांच्या ‘ईमपॉवर’ उपक्रमाच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत बालसंगोपन संस्थांमधील मुलांना ट्रॉमा-आधारित समुपदेशन, मानसिक आरोग्य सहाय्य आणि सामाजिक कौशल्य विकासावर भर दिला जातो.
एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीत 20 संस्थांमधील 1,861 मुलांना या प्रकल्पाचा लाभ मिळाला असून 5,000 हून अधिक समुपदेशन सत्रे घेण्यात आली आहेत. या प्रक्रियेमुळे मुलांच्या भावनिक स्थैर्यात आणि वर्तनात सकारात्मक बदल दिसून आला आहे.
प्रारंभी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूर या जिल्ह्यांपुरता मर्यादित असलेला हा प्रकल्प आता राज्यातील 121 बालसंगोपन संस्थांपर्यंत विस्तारण्यात येणार आहे. यात अनाथ, अत्याचारग्रस्त तसेच कायद्याच्या संघर्षात असलेली मुले यांचा समावेश आहे.
या प्रकल्पात पारंपरिक समुपदेशनासोबत आर्ट-आधारित थेरपीचाही वापर केला जातो, ज्यामुळे मुले आपल्या भावना सहज व्यक्त करू शकतात. तसेच काही ठिकाणी ऑक्युपेशनल थेरपी सुविधा सुरू करण्याचीही योजना आहे.
याशिवाय, बालकल्याण समिती सदस्य, अधिकारी आणि संस्थांतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन मुलांसाठी अधिक सुरक्षित आणि संवेदनशील वातावरण तयार करण्यावर भर दिला जात आहे.
‘मासूम’ प्रकल्प हा सार्वजनिक-खासगी भागीदारीचा प्रभावी नमुना ठरत असून, मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांना उज्ज्वल भविष्याकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे.
हेही वाचा: MAHA TET 2026: अर्ज भरण्याची मुदत 24 एप्रिलपर्यंत वाढवली; उमेदवारांना दिलासा.

