देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांचा किमान 50 टक्के सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘नारी शक्ती वंदन महिला संमेलन’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार चित्रा वाघ, अभिनेत्री रवीना टंडन, प्राजक्ता माळी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकामुळे देशातील महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वात मोठी वाढ होणार आहे. संसद आणि राज्य विधिमंडळात अधिक महिला लोकप्रतिनिधी निवडून येतील, ज्यामुळे महिला सक्षमीकरणाला नवी दिशा मिळेल.
ते म्हणाले की, सध्या लोकसभेत महिलांचे प्रमाण कमी असले तरी 2029 पर्यंत ही संख्या लक्षणीय वाढेल. या विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छाशक्तीमुळेच हा निर्णय शक्य झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’सारख्या उपक्रमांमुळे लिंग गुणोत्तर सुधारले असून शिक्षणाच्या संधी वाढल्या आहेत. तसेच ‘लखपती दीदी’सारख्या योजनांमुळे ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळाली आहे.
महाराष्ट्रातही महिलांना विविध महत्त्वाच्या पदांवर संधी मिळत असून प्रशासन, पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व 55 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी यांसारख्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचे दर्शन घडवण्यात आले.
हेही वाचा: महाराष्ट्रात उद्योगांचा नवा बूम! 1.65 लाख कोटींची गुंतवणूक; 8 हजारांहून अधिक रोजगार – मुख्यमंत्री फडणवीस.

