राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक परिणामकारक आणि लोकाभिमुख करण्यासाठी आरोग्य उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत कार्यरत सर्व समित्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यासाठी स्थानिक स्तरावर कार्यरत समित्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात ग्रामीण आणि शहरी भागात विविध आरोग्य योजनांची अंमलबजावणी केली जाते. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, निधीचा पारदर्शक वापर आणि रुग्णकेंद्रित सेवा सुनिश्चित करण्यासाठी रुग्ण कल्याण समिती (RKS), जन आरोग्य समिती (JAS), महिला आरोग्य समिती (MAS) आणि ग्राम आरोग्य, पोषण व स्वच्छता समिती (VHNSC) कार्यरत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी या समित्यांचे कार्य अपेक्षेप्रमाणे सक्रिय नसल्याने त्यांना नव्याने बळकटी देण्याची गरज निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागात VHNSC आणि शहरी भागात MAS या समित्या स्वच्छता, पोषण, पाणीपुरवठा आणि प्राथमिक आरोग्य सेवांवर लक्ष केंद्रित करतात. तर JAS आणि RKS या समित्या आरोग्य संस्थांमधील सेवा गुणवत्ता, रुग्णांच्या सुविधा आणि निधीच्या वापरावर देखरेख ठेवतात. या सर्व समित्यांचा सक्रिय सहभाग वाढविल्यास स्थानिक पातळीवरच अनेक समस्या तातडीने सोडवता येतील, असे आबिटकर यांनी नमूद केले.
समितींच्या पुनरुज्जीवनासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, आरोग्य अधिकारी आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट, युवक प्रतिनिधी, तसेच आरोग्य सेवा घेतलेले रुग्ण यांचा समावेश करून समित्या अधिक प्रभावी बनविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यासोबतच प्रत्येक समितीने नियमित बैठका घेऊन स्थानिक समस्यांवर कृती आराखडे तयार करावेत, सदस्यांचे प्रशिक्षण आणि क्षमता विकासावर भर द्यावा तसेच विविध विभागांमध्ये समन्वय साधावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी लोकसहभाग अत्यावश्यक असल्याचे सांगत मंत्री आबिटकर यांनी सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांना या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. समित्यांच्या माध्यमातून स्थानिक गरजांनुसार उपाययोजना केल्यास नागरिकांचा आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा: धाराशिवमध्ये ‘युनिसेफ’चा लिंग समभाव उपक्रम; १८ हजार विद्यार्थ्यांमध्ये बदलाची नवी सुरुवात.

