राज्य शासनाच्या सहकार्याने UNICEF आणि अंगाई (UNGEI) यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव जिल्ह्यात लिंग समभावावर आधारित एक अभिनव शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला असून, त्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये समानतेची जाणीव दृढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. खेळ, चर्चा आणि संवादाच्या माध्यमातून शिकवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे मुला-मुलींमधील भेदभावाविषयीची समज बदलू लागली आहे.
देशात प्रथमच प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेल्या या उपक्रमात १२० शाळा, ८०० हून अधिक शिक्षक आणि सुमारे १८ हजार विद्यार्थी सहभागी झाले. इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘मीना राजू मंच’च्या माध्यमातून लिंग समानतेचे विविध पैलू सुलभ पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले. शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात आला असून स्थानिक स्वयंसेवी संस्था स्वयं शिक्षण प्रयोग, कोरो आणि मावा यांनीही सहभाग नोंदवला.
या उपक्रमाचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या विचारसरणीत दिसून येत आहे. आर्णी गावातील प्रज्ञा पाटोळे या विद्यार्थिनीने सांगितले की, या प्रशिक्षणानंतर तिने आपल्या कुटुंबीयांशी अन्नातील लिंगभेदाविषयी चर्चा केली आणि समानतेचा संदेश दिला. “मुलं आणि मुली दोघांनाही समान अन्नाची गरज असते,” हे पटवून देताना तिच्या कुटुंबीयांचाही दृष्टिकोन बदलला.
या उपक्रमामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढल्याचेही दिसून येत आहे. अनेक मुली उच्च शिक्षण आणि करिअरविषयी स्वप्न पाहू लागल्या आहेत. प्रज्ञा स्वतः डॉक्टर होऊन महिलांच्या आरोग्य, पोषण आणि मासिक पाळी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त करते. ती सध्या गावातील बालसभा आणि शालेय कार्यक्रमांमधून लिंग समभावाबाबत जागरूकता निर्माण करत आहे.
शासन आणि सहभागी संस्थांच्या मते, अशा उपक्रमांमुळे लहान वयातच समानतेचे मूल्य रुजत असून भविष्यात समाजात सकारात्मक बदल घडविण्यास याचा मोठा हातभार लागणार आहे.

