महाराष्ट्रात एज्युसिटी आणि मेडिसिटी प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी संबंधित विभागांना प्रकल्पासाठी जागा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणू गोपाल रेड्डी, CIDCO चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, जगभरातील अनेक नामांकित विद्यापीठांनी महाराष्ट्रात कॅम्पस सुरू करण्यास उत्सुकता दर्शवली आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी कालबद्ध नियोजन करून त्वरित कार्यवाही करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एज्युसिटी व मेडिसिटी प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यासाठी जागा संपादन प्रक्रिया सुरू आहे. मेडिसिटीसाठीही आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
या प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळणार असून राज्यात स्टार्टअप आणि संशोधन क्षेत्रालाही मोठी चालना मिळेल. विविध क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या संधी वाढून महाराष्ट्र शिक्षण आणि नवोन्मेष क्षेत्रात अग्रस्थानी येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
हेही वाचा: महाराष्ट्रात 56 लाख वृक्ष लागवड; ‘मित्रा’ व अर्थ डे नेटवर्क इंडिया यांचा MoU, क्लायमेट ॲक्शनला गती.

