राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी उपलब्ध निधीचे योग्य आणि नियोजनबद्ध वापर करण्याचे निर्देश आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. आरोग्य भवन येथे झालेल्या आढावा बैठकीत 2025-26 या आर्थिक वर्षातील राज्य निधी आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत मिळालेल्या निधीच्या वापरावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, प्रभावी आरोग्य सेवा देणे ही शासनाची प्राथमिकता असून निधीचा प्रत्येक रुपया नागरिकांच्या उपचारांपर्यंत पोहोचला पाहिजे. जिल्हास्तरावर थॅलेसेमिया रुग्णांना नियमितपणे दिव्यांग प्रमाणपत्र देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. औषधे व वैद्यकीय यंत्रसामग्री खरेदी प्रक्रियेचा आढावा घेताना पारदर्शकता आणि कार्यक्षमतेवर भर देण्यात आला. 2024 ते 2026 या कालावधीत झालेल्या खरेदीचे परीक्षण करून पुढील नियोजनाबाबतही चर्चा झाली.
महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये PCOD क्लिनिक सुरू करण्याच्या प्रस्तावावरही बैठकीत विचार करण्यात आला. हा उपक्रम महिलांसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ या अभियानाचा आढावा घेताना या अनुवंशिक आजाराबाबत जनजागृती वाढवण्यावर भर देण्यात आला. लग्नपूर्व समुपदेशनाची गरज अधोरेखित करत वधू-वर सूचक मंडळांमार्फत जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीत विविध कार्यक्रमांअंतर्गत प्रस्तावित अंदाजपत्रक, खर्च आणि निधी वितरणाची सविस्तर माहिती घेण्यात आली. यावेळी आरोग्य सेवा आयुक्त आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा: ‘बळीराजा पाणंद रस्ते योजना’ कोल्हापुरात मिशन मोडवर; पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे निर्देश.

