नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन उत्साहात पार पडले. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. “मागेल त्या शेतकऱ्याला कर्ज मिळाले तरच सहकार चळवळ खऱ्या अर्थाने पुढे जाईल,” असे ठाम मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची संस्था असून, तिच्या माध्यमातून अधिकाधिक लाभ पोहोचवण्यासाठी बँकांनी सक्षम आणि पारदर्शकपणे काम करण्याची गरज असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. सहकार चळवळीने महाराष्ट्राची ओळख निर्माण केली असून, तिचे बळकटीकरण ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण अध्यक्षस्थानी होते. त्यांनी जिल्हा बँकेच्या पुनरुत्थानाचा इतिहास सांगताना, बँक संकटात असताना तिचे अस्तित्व टिकवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात १२५ कोटींच्या कर्जाचे अनुदानात रूपांतर केल्यामुळे बँक वाचली, असे त्यांनी सांगितले.
मंत्री पाटील यांनी पुढे सांगितले की, सहकारी बँकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो, मात्र त्यावर मात करत नांदेड जिल्हा बँकेने प्रगतीचा मार्ग धरला आहे. आगामी काळात बिंदूनामावलीनुसार पारदर्शक भरती प्रक्रिया राबवली जाईल. तसेच शेतकऱ्यांनी आधुनिक शेती, तंत्रज्ञानाचा वापर आणि योग्य खत व्यवस्थापन यावर भर देत जिल्हा बँकेशी व्यवहार वाढवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात बँकेच्या नव्या इमारतीसाठी भोकर बाजार समितीने दिलेल्या विनामूल्य जागेबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. विविध मान्यवर, संचालक, शेतकरी आणि नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
हेही वाचा: नागपुरात भारतदुर्गा मंदिराचा शिलान्यास; नवचेतनेचा संदेश देईल – मुख्यमंत्री फडणवीस.

