राज्यातील वैद्यकीय क्षेत्रासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणुका २६ एप्रिल २०२६ रोजी पार पडणार आहेत. परिषदेवरील नऊ सदस्यांची निवड करण्यासाठी होणाऱ्या या निवडणुकीत राज्यभरातील सुमारे १ लाख ४० हजार नोंदणीकृत व नोंदणी नूतनीकरण केलेले वैद्यकीय व्यावसायिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
या निवडणुकीसाठी एकूण ६० उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, मतदानाची प्रक्रिया सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडणार आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम १९६५ मधील तरतुदीनुसार, परिषदेतील सदस्यांची निवड ही थेट डॉक्टरांकडून केली जाते, त्यामुळे या निवडणुकीकडे वैद्यकीय क्षेत्राचे विशेष लक्ष लागले आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्हा मुख्यालयावर जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारयादी आणि केंद्रांचा सविस्तर तपशील परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मतमोजणी प्रक्रिया २९ एप्रिल रोजी हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था, परळ येथे सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार असून निकालाकडे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

