मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी आणि अपघातांना मोठा दिलासा देणारा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आला असून १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली आणि ९९ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती दिली.
सुमारे १०.५ किमी लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे घाटातील धोकादायक वळणे पूर्णपणे बायपास होणार आहेत. त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि सिग्नल-फ्री होईल. या नव्या मार्गामुळे मुंबई–पुणे प्रवासाचा वेळ तब्बल २० ते ३० मिनिटांनी कमी होणार असून अपघातांचे प्रमाण जवळपास शून्यावर येईल, असा दावा शिंदे यांनी केला.
या प्रकल्पात दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील १८२ मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीत आणि वेगवान वाऱ्यांमध्ये हे काम पूर्ण करण्यात आले. विशेष म्हणजे हा बोगदा सुमारे २३.७५ मीटर रुंद असून जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो.
‘मिसिंग लिंक’ सुरू झाल्यानंतर घाटातील वाहतूक मोठ्या प्रमाणावर कमी होणार असून इंधन बचत, प्रदूषणात घट आणि वेळेची बचत होणार आहे. सुरुवातीला बस आणि हलक्या वाहनांना प्राधान्य दिले जाणार असून प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.
टोलवाढीबाबत स्पष्ट करताना शिंदे यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे कोणतीही नवीन टोलवाढ होणार नाही. खालापूर टोल नाक्यावरही सध्या वाढ प्रस्तावित नाही.
सुमारे ६७०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाचे अंतर सुमारे ६ किमीने कमी होणार आहे. याचा थेट परिणाम उद्योग, आयटी, सेवा क्षेत्र आणि लॉजिस्टिक्सवर होणार असून राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे.
या प्रकल्पामुळे लोहगड किल्ला, विसापूर किल्ला आणि कार्ला लेणी यांसारख्या पर्यटन स्थळांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. त्यामुळे पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
राज्यात पुढील काळात समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड आणि इतर ऍक्सेस कंट्रोल प्रकल्पांना जोडून मजबूत दळणवळण जाळे उभारण्यावर सरकारचा भर असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. मुंबई आणि पुणे दरम्यानचा
प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ करणारा हा प्रकल्प राज्याच्या विकासासाठी गेमचेंजर ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा: दर्जेदार विद्यार्थी घडवणे ही नैतिक जबाबदारी – डॉ. अशोक वुईके.

