मुंबईतील IIT Bombay येथे ७२० कोटी रुपयांची अत्याधुनिक ‘क्वांटम फॅब्रिकेशन’ सुविधा उभारली जात असून, भारतातील ही पहिली फुल-स्टॅक क्वांटम हार्डवेअर प्रणाली ठरणार आहे. यामुळे महाराष्ट्र क्वांटम तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक स्तरावर पुढे जाण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत आहे.
माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी ‘वर्ल्ड क्वांटम डे’ निमित्त आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ६,००० कोटी रुपयांच्या राष्ट्रीय क्वांटम मिशनमुळे देशातील संशोधनाला वेग मिळाला आहे. त्याच धर्तीवर राज्यात ‘महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन’ सुरू करण्यात आले आहे.
या प्रकल्पांतर्गत Tata Consultancy Services आणि आयआयटी बॉम्बे यांच्या सहकार्याने देशातील पहिल्या ‘क्वांटम डायमंड मायक्रोचिप इमेजर’वरही काम सुरू आहे. तसेच, हॅक-प्रूफ क्वांटम कम्युनिकेशन क्षेत्रातही जागतिक स्तरावर प्रगती होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
क्वांटम तंत्रज्ञान हे आता केवळ संकल्पना राहिले नसून संगणक, आरोग्य, वित्त, संवाद व्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेत क्रांती घडवणारे तंत्रज्ञान ठरत आहे. पारंपरिक ‘बिट्स’च्या पुढे जाऊन ‘क्युबिट्स’च्या माध्यमातून एकाच वेळी अनेक गणना करण्याची क्षमता क्वांटम संगणनात आहे, असे मंत्री शेलार यांनी स्पष्ट केले.
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, क्वांटम सुपरपोजिशन आणि इनटँगलमेंटसारख्या संकल्पनांमुळे संगणनाची गती घातांकी वाढणार असून, औषधनिर्मिती, कृषी संशोधन आणि औद्योगिक प्रक्रियांमध्ये मोठे बदल घडतील. सुरक्षित संप्रेषणासाठी क्वांटम तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांनीही या तंत्रज्ञानामुळे प्रशासन, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सेवांमध्ये आमूलाग्र बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली. संशोधन, कौशल्य विकास आणि उद्योगवृद्धीसाठी सक्षम परिसंस्था निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाकडून या क्षेत्रासाठी निधी व धोरणात्मक पाठबळ दिले जात असून मुंबई आणि पुणे येथील संस्था संशोधनात आघाडीवर आहेत. 2030 पर्यंत महाराष्ट्राला क्वांटम तंत्रज्ञानात जागतिक नेतृत्व मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा: वाहतूक नियमभंगावर कडक कारवाई; वारंवार उल्लंघन करणाऱ्यांवर ‘गंभीर गुन्हा’, ई-चलान प्रणाली अधिक पारदर्शक.

