चंद्रपूर जिल्हा परिषदेत आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभात पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसून विद्यार्थ्यांना संस्कारक्षम, सामाजिक जाणिवा असलेले आणि निर्णयक्षम नागरिक बनविणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांमध्ये भावनिक व अध्यात्मिक बुद्धिमत्ता विकसित होणे तितकेच गरजेचे असून, संकटाच्या काळात योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणे ही शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडले तरच समाज आणि देशाचे भवितव्य उज्ज्वल होईल, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. आपल्या भाषणात डॉ. वुईके यांनी स्वतःचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाल्याची आठवण सांगत शिक्षणाच्या मूलभूत मूल्यांवर भर दिला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच प्रत्येकाला समान संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी ‘निपुण’ उपक्रमात जिल्ह्याने मिळवलेल्या यशाचा उल्लेख करत शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. तर मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये रोबोटिक्ससारखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला जात असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात प्रश्नमंजुषा, चित्रकला, निबंध, वक्तृत्व आणि चावडी वाचन अशा विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीस मोठी चालना मिळत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
हेही वाचा: धुळेतील AI आधारित ‘ई-सुविधा’ पोर्टलचे लोकार्पण; प्रशासन होणार अधिक पारदर्शक.

