चिखली तहसील कार्यालयात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांच्या समस्या थेट ऐकून प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून 110 हून अधिक निवेदने प्राप्त झाली. महसूलमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यावर तत्काळ निर्णय घेण्यासाठी विविध विभागांचा आढावा घेतला.
प्रशासनाला कडक सूचना
मंत्री बावनकुळे म्हणाले की, नागरिकांच्या समस्या सोडविणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. ‘छत्रपती महाराजस्व शिबीर’च्या माध्यमातून गावपातळीवर जाऊन नागरिकांना सेवा देण्यावर भर द्यावा. कोणताही पात्र लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये, याची दक्षता घ्यावी.
विविध विषयांवरील निवेदने
या जनसंवादात मालकी हक्क, रस्ते, पाणी, शेती, घरकुल, आरोग्य, वाळू, क्रीडा आणि बांधकाम अशा विविध विषयांवरील तक्रारी प्राप्त झाल्या. अनेक नागरिकांनी वैयक्तिक अडचणी मांडल्या.
तात्काळ कारवाईचे आदेश
प्राप्त सर्व निवेदनांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना महसूलमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी नियमित आढावा घेऊन प्रशासन अधिक गतिमान करावे, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा: अहिल्यानगरमध्ये 3,844 रुग्णांना 31.19 कोटींची मदत; मुख्यमंत्री सहाय्यता निधी ठरतोय आधार.

