धाराशिव जिल्ह्यात खेळ, संवाद आणि सहभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये लिंग समभावाची जाणीव निर्माण करणारा उपक्रम प्रभावी ठरत असून ग्रामीण भागातील मुलींच्या विचारसरणीत सकारात्मक बदल दिसून येत आहे. राज्य शासनाच्या सहकार्याने UNICEF आणि अंगाई यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम देशात प्रथमच प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना खेळाधारित शिक्षणातून लिंगभेद, समानता आणि सामाजिक जाणीव याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. जिल्ह्यातील १२० शाळांमधील ८०० हून अधिक शिक्षक आणि सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. शिक्षण विभागाच्या अंतर्गत कार्यरत डीआयईटीच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात आला.
या उपक्रमात ‘मीना राजू मंच’सारख्या माध्यमातून संवाद, चर्चा आणि प्रत्यक्ष सहभागावर भर देण्यात आला. स्थानिक स्वयंसेवी संस्था स्वयं शिक्षण प्रयोग, कोरो आणि मावा यांच्या सहभागामुळे उपक्रम अधिक प्रभावी ठरला. किशोरवयीन मुला-मुलींमध्ये समानतेची जाणीव निर्माण करण्यासोबतच पालक आणि समाजातही विचारांमध्ये बदल घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आर्णी गावातील इयत्ता आठवीतील प्रज्ञा पाटोळे हिने या उपक्रमामुळे झालेला बदल सांगताना म्हटले की, “मी माझ्या आई आणि काकूंना मुलींनाही समान अन्नाची गरज असते हे समजावून सांगितले. आम्ही दोघेही समान काम करतो, त्यामुळे गरजही समान आहे.” अशा अनुभवांमुळे कुटुंब पातळीवरही लिंग समभावाची जाणीव वाढताना दिसत आहे.
या उपक्रमामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे स्पष्ट होत असून अनेक मुली उच्च शिक्षण आणि करिअरकडे वळण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. प्रज्ञा पाटोळे भविष्यात डॉक्टर बनून महिलांच्या आरोग्य आणि पोषणाबाबत जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त करते. ती सध्या गावातील विविध कार्यक्रमांमध्ये लिंग समभावाबाबत जागरूकता निर्माण करत आहे.
शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांच्या विचारांमध्येही सकारात्मक बदल होत असून बालपणीच समानतेचे धडे मिळाल्यास समाजात व्यापक परिवर्तन घडू शकते, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा: मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मे ला सुरू; घाट बायपासमुळे ३० मिनिटे वेळ बचत.

