अहिल्यानगर जिल्ह्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून 3,844 गरजू रुग्णांना सुमारे 31 कोटी 19 लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. शासनाच्या विविध आरोग्य योजनांतून मदत न मिळालेल्या रुग्णांसाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली निधीच्या कार्यपद्धतीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. जिल्हा कक्षांची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया आणि अर्जांचा जलद निपटारा यामुळे मदत वितरणाचा वेग वाढला आहे.
20 गंभीर आजारांसाठी मदत
या योजनेअंतर्गत कॉक्लियर इम्प्लांट, हृदय, किडनी, यकृत, फुफ्फुस प्रत्यारोपण, कर्करोग उपचार, अपघातग्रस्त रुग्ण, नवजात शिशुंचे आजार अशा 20 गंभीर आजारांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यामुळे अनेक रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होत आहे.
CSR व सामंजस्य करारातून मोठी मदत
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे CSR अंतर्गत विशेष निधी उपलब्ध होऊन गरजू बालकांना उपचार सुलभ होणार आहेत.
राज्यभरातील मदतीचा आढावा
१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील 40,776 रुग्णांना एकूण 333 कोटी रुपयांहून अधिक मदत देण्यात आली. त्यापैकी अहिल्यानगर जिल्ह्यातील 3,844 रुग्णांना 31.19 कोटी रुपयांची मदत वितरित झाली आहे.
लाभासाठी संपर्क
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र रुग्णांनी 1800 123 2211 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा: ‘आई’ पर्यटन धोरणाचा अमरावतीत प्रभाव; 160 महिला उद्योजिकांची नोंदणी, पर्यटन क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग.

