नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिमाखदार शुभारंभ झाला. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट करत, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी स्वच्छ, निर्मळ आणि अविरत ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त आयोजित या यात्रेचा उद्देश जलसंवर्धनाबाबत जनजागृती करणे, लोकसहभाग वाढवणे आणि शाश्वत जलव्यवस्थापनाची संकल्पना रुजवणे हा आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, भारतीय परंपरेत नदीला ‘आई’चे स्थान दिले गेले असून तिचे संवर्धन ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
ते पुढे म्हणाले की, अहिल्यादेवींनी घाट, बारव आणि जलस्रोत उभारून अध्यात्म आणि उपयुक्तता यांचा सुंदर संगम घडवला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत राज्य शासन जलसंवर्धनावर भर देत आहे. राज्यातील अनेक जलसिंचन प्रकल्पांमुळे लाखो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून दुष्काळी भागांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कार्यक्रमाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, त्र्यंबकेश्वर आणि चौंडी येथून सुरू झालेल्या या दोन यात्रा मध्यप्रदेशातील महेश्वर येथे एकत्र येऊन समारोप करतील. राज्यातील ३० नदीखोऱ्यांतील पाणी कलशांच्या माध्यमातून नर्मदेला अर्पण करण्यात येणार असून जलसंवर्धनाचा संदेश देशभर पोहोचवला जाईल.
या प्रसंगी कुशावर्त तीर्थातील जलकलशाचे पूजन करण्यात आले तसेच ‘गोदा ते नर्मदा जलयात्रा २०२६’ या गीताचे विमोचन आणि ‘उन्नत नाशिक’ अभियानाच्या बोधचिन्हाचे अनावरणही करण्यात आले. विविध भागांतून आलेले शेकडो जलयात्री, वारकरी आणि नागरिक या यात्रेत सहभागी झाले आहेत.
२५ ते २९ एप्रिल दरम्यान ही यात्रा नाशिक, संगमनेर, शिर्डी, संभाजीनगर, धुळे मार्गे प्रवास करत मध्यप्रदेशातील महेश्वर येथे पोहोचणार आहे. जलसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा व्यापक संदेश देणारी ही यात्रा राज्यात आणि देशभरात महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा: ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा चौंडी येथे शुभारंभ; देशभर जलसंवर्धनाचा संदेश – एकनाथ शिंदे.

