Mahila Bachat Gat Pokra Yojana : ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण आणि शेतीत यांत्रिकीकरण वाढवण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ (पोक्रा – टप्पा २) अंतर्गत महिला बचत गटांना कृषी औजारे बँक उभारण्यासाठी ₹24 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.
जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या या योजनेमुळे शेतीकामात यांत्रिकीकरणाचा वेग वाढण्याची अपेक्षा आहे. मजुरांवरील अवलंबित्व कमी करून शेतीची कामे वेळेत आणि कमी खर्चात पूर्ण करण्यास मदत होणार आहे.
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना महागडी यंत्रसामग्री खरेदी करणे शक्य नसल्याने गावस्तरावरच भाडेतत्त्वावर यंत्रे उपलब्ध करून देण्यासाठी ही ‘कृषी औजारे बँक’ संकल्पना राबवली जात आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वेळेवर पेरणी आणि काढणीसाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे.
या योजनेचा लाभ पोक्रा अंतर्गत निवडलेल्या गावांतील ‘उमेद’ किंवा ‘माविम’ अंतर्गत नोंदणीकृत महिला बचत गट आणि ग्रामसंघांना मिळणार आहे. गटात किमान 10 सदस्य असणे आवश्यक आहे. एका गावातून अनेक अर्ज आल्यास ऑनलाइन लॉटरीद्वारे निवड केली जाईल.
अनुदान प्रकल्पाच्या 60 टक्क्यांपर्यंत असून कमाल मर्यादा ₹24 लाख आहे. प्रकल्प खर्च ₹20 लाखांपेक्षा जास्त असल्यास बँक कर्ज घेणे बंधनकारक आहे. गटांना ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, बेड मेकर, बीबीएफ यंत्र यांसारखी विविध कृषी उपकरणे निवडण्याची मुभा असेल.
इच्छुक महिला बचत गटांनी ‘FPO-DBT’ पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन अर्ज करावे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आणि बँक तपशील सादर करणे बंधनकारक आहे.
