देशातील महत्त्वाच्या प्रशासकीय प्रक्रियांपैकी एक असलेल्या जनगणना २०२७ला गती देण्यासाठी राज्यात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. जनगणना 2027 ही जनगणना यंदा प्रथमच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असल्याने नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवण्यावर शासनाचा भर आहे.
जनगणना अधिनियम 1948 अंतर्गत होणाऱ्या या प्रक्रियेत घर नोंदणी व गृहनिर्माण जनगणना (HLO) टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान पार पडणार आहे. त्याआधी १ मे ते १५ मे या कालावधीत स्वयं-गणना (Self-Enumeration) टप्पा राबविण्यात येणार आहे. नागरिकांना यासाठी “Census 2027-HLO” या मोबाईल अॅपद्वारे तसेच ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून माहिती भरता येणार आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबईतील मंत्रालय परिसरातील ‘त्रिमूर्ती प्रांगण’ येथे विशेष जनजागृती उपक्रम सुरू करण्यात आला आहे. बॅनर्स, माहितीपर साहित्य आणि विविध माध्यमांतून नागरिकांना जनगणनेचे महत्त्व समजावून सांगितले जात आहे. या उपक्रमाचे नियोजन अतिरिक्त मुख्य सचिव व राज्य नोडल अधिकारी सीमा व्यास यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २३ डिसेंबर २०२५ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, जनगणना प्रक्रियेत राज्य यंत्रणेची सक्रिय भूमिका निश्चित करण्यात आली आहे. मंत्रालयासारख्या प्रमुख शासकीय ठिकाणी अशा मोहिमा राबवल्याने माहितीचा प्रसार अधिक वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
डिजिटल पद्धतीने होणारी ही जनगणना अधिक अचूक, पारदर्शक आणि जलद होण्याची अपेक्षा असून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन प्रक्रिया यशस्वी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा: बसथांब्यांवर बसेस थांबणे बंधनकारक; नागपूरमध्ये ‘राजमाता जिजाऊ’च्या २४ नव्या बसेस दाखल.

