मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्रालयात होणारी गर्दी कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी याबाबत कडक निर्बंध लागू केले आहेत.
नव्या आदेशानुसार, मंत्र्यांसोबत त्यांच्या कार्यालयातील केवळ एका व्यक्तीलाच मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय इतर कोणत्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांना बैठकीच्या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही. या निर्णयामुळे मंत्रालयात उसळणाऱ्या गर्दीवर नियंत्रण येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मंत्र्यांना भेटण्यासाठी मंत्रालयात येतात. त्यामुळे मोठी गर्दी होते आणि कामकाजात अडथळे निर्माण होतात. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारने स्पष्ट केले आहे की, बैठकीदरम्यान किंवा इतर कोणालाही उपस्थित राहायचे असल्यास मुख्यमंत्र्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असेल. संबंधित परवानगीची कागदपत्रे सचिव कार्यालय आणि सुरक्षा अधिकाऱ्यांकडे सादर करावी लागतील.
तसेच, मंत्रिमंडळ बैठक सुरू असताना आमदार-खासदारांच्या स्वीय सहाय्यकांना बैठकीच्या परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. बैठकीपूर्वी आणि नंतर दोन तास मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृह किंवा सातव्या मजल्यावर कोणतीही बैठक आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे.
या नव्या नियमांमुळे मंत्रालयातील गर्दी आटोक्यात येऊन प्रशासनाचे कामकाज अधिक सुरळीत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा: Ladki Bahin Yojana Ekyc Update Maharashtra: नवीन अर्ज प्रक्रिया सुरु होणार कि नाही?.

