Auto Rickshaw Driver Scheme: राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मोठा दिलासा देणारी योजना सुरू झाली आहे. ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळ’ अंतर्गत आता नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून चालकांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे.
वसई प्रादेशिक परिवहन विभागामार्फत (RTO) चालकांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र दिले जात आहे. परवाने खुले झाल्यानंतर वसई-विरार परिसरात रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून हजारो चालक या व्यवसायावर अवलंबून आहेत.
अडचणीच्या काळात आर्थिक व सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी राज्य सरकारने हे मंडळ स्थापन केले आहे. यामध्ये विमा, आरोग्य, शिक्षण आणि आर्थिक मदतीच्या योजना समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
या योजनेअंतर्गत चालकांना जीवनविमा व अपंगत्व विमा, कर्तव्यावर दुखापत झाल्यास आर्थिक मदत (₹50 हजारांपर्यंत), आरोग्य सुविधा, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि कौशल्यविकास योजना मिळणार आहेत. तसेच 65 वर्षांवरील चालकांसाठी सन्मान अनुदानाची तरतूदही आहे.
सध्या पालघर जिल्ह्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांची नोंदणी सुरू असून मोठ्या संख्येने चालकांनी सहभागी होण्याचे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.
